सव्वा कोटीची कारवाई : इनोव्हा, ब्रिझा, होंडा सिटी, स्विफ्ट, मारुती बलेनो आणि 4 क्रेटा चोरीच्या सापडल्या
सातारा | पोलीस रेकाॅर्डवरील आरोपीकडून तब्बल 1 कोटी 15 लाख रूपयांच्या किमतीची 10 चारचाकी वाहने, 8 चोरीच्या मोटारसायकल असा एकूण सव्वा कोटीचा मुद्देमला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्याची रेकॉर्डब्रेक कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली असून याप्रकरणी तब्बल 7 जणांना पोलिसानी अटक केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हयातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथक तयार केले आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत 30 एप्रिल 2023 रोजी माहिती प्राप्त झाली की, पोलीस रेकाॅर्डवरील आरोपी अजिम सलीम पठाण (वय- 38 वर्षे, रा. रहिमतपूर ता.कोरेगाव) याने परराज्यातून चोरी झालेली चारचाकी वाहने आणून ती सातारा, रायगड आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये विक्री केली आहेत. या बाबतची माहिती मिळताच संशयित आरोपीस ताब्यात घेवून पोलिसांनी चाैकशी केली. आरोपी अजिम सलिम पठाण व कोल्हापूर येथील एक इसम याच्या ठावठिकाण्याबाबत गोपनिय माहिती प्राप्त करून त्याला रहिमतपूर ता. कोरेगाव येथून ताब्यात घेतले. या गुन्हयात चोरी केलेली मारुती सुझुकी बॅगर आर कार तसेच दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यामध्ये चारी केलेल्या इनोव्हा क्रिस्टा-1, क्रेटा-4. मारुती ब्रिझा-1, होंडा सिटी-1, मारुती स्विफ्ट 1, मारुती बलेनो-1 अशा चोरीच्या 1,15,00,000/- (एक कोटी पंधरा लाख रुपये किमतीच्या) एकूण 10 चारचाकी गाड्या जप्त करून गाड्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केले आहे.
या दोन्ही गुन्ह्यात 7 संशयित आरोपींना अटक केलेली असून त्यांची नांवे पुढीलप्रमाणे :- चारचाकी वाहन चोरीमधील आरोपींची नावे-
१) अजिम सलिम पठाण वय ३८ वर्षे, रा.रहिमतपूर ता. कोरेगाव जि. सातारा
२) अजित आण्णाप्पा तिपे वय ४० वर्षे रा.कोल्हापूर
मोटार सायकल चोरीमधील आरोपींची नावे-
१) महेश रामचंद्र अवघडे वय २५ वर्षे रा.कोडोली ता.जि.सातारा.
२) संतोष मारुती बाबर वय २० वर्षे रा.बाबाची वाडी ता.कोरेगाव जि. सातार
३) वैभव प्रमोद बाबर वय २३ वर्षे रा.कोंडवे ता.जि. सातारा
४) कृष्णत रत्नकांत काकडे वय २६ वर्षे रा.मसूर ता.कराड जि.सातारा
५) अमित राजेंद्र बैले वय १९ वर्षे रा.उंब्रज ता.कराड जि.सातारा
सातारा, पाटण व किणी टोलनाक्याहून 7 दुचाकी हस्तगत
भुईंज पोलीस ठाणे हद्दीत एका इसमास धक्काबुक्की व मारहाण करुन त्याची होंडा अॅक्टीव्हा मोपेड व खिशातील 1 हजार 830 रुपये रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याबाबत भुईज पोलीसांत गुन्हा नोंद आहे. त्याप्रमाणे अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना व त्याचे पथकास नमुद आरोपींना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. नमुद तपास पथकाने प्राप्त माहितीमधील आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत गोपनिय माहिती काढून त्यांना ताब्यात घेतलं. तसेच नमुद गुन्ह्यात चोरीस गेलेली होंडा अॅक्टीव्हा मोपेड तसेच आरोपी महेश रामचंद्र अवघडे व त्याचे इतर दोन साथीदारांनी सातारा शहर, पाटण, किनी टोलनाका तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या 7 मोटार सायकल अशा एकूण 3 लाख 20,000/- रुपये किमतीच्या चोरीस गेलेल्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.