सुपने आरोग्य केंद्रांसाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी ः जगदीश पाटील

कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट आरोग्य केंद्र प्रकल्पातून जिल्हा वार्षिक योजनेद्वारे तब्बल 6 कोटी 16 लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा प्रशासकीय मान्यतेचा आदेश नुकताच पारीत झाला असून आ. चव्हाण यांच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदार संघातील सुपने आरोग्य केंद्रासाठी 1 कोटी 80 लाख 85 हजारांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती काॅंग्रेसचे युवा नेतृत्व जगदीश पाटील यांनी सांगितले आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्यातील सुपने जिल्हा परिषद गटातील 21 गावांसाठी अत्यंत गरजेचे असलेल्या सुपने आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सुपने- तांबवे गटातील तांबवे, सुपने, उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे, साजूर, गमेवाडी, पाठरवाडी, आरेवाडी, आबईचीवाडी, वस्ती आणि माैजे साकुर्डी, बेलदरे, विजयनगर, वसंतगड, म्होप्रे, डेळेवाडी, पाडळी- केसे, भोळेवाडी, पश्चिम सुपने, किरपे या गावांना या आरोग्य केंद्राचा उपयोग होत असतो. दररोज शेकडो पेशंट या आरोग्य केंद्रातून उपचार घेत आहेत.
रेठरे बुद्रुक, काले, हेळगाव, सुपने, वडगाव हवेली व कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकूण 6 कोटी 16 लाख रुपयांचा निधी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपलब्ध केला आहे. उपलब्ध निधीतून केंद्रातील नुतनीकरण, विस्तारीकरण, डागडुजी, रंगकाम, आधुनिकीकरण, काँक्रिट रस्ते, संरक्षक भिंत तसेच आवश्यकतेनुसार विद्युतीकरण यासह पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. याद्वारे आरोग्य केंद्रे स्मार्ट होणार असल्याने आ. चव्हाण यांचे सुपने- तांबवे जिल्हा परिषद गटातील लोकांकडून अभिनंदन होत आहे.
———————————
पृथ्वीराज बाबांचे आभार
कोरोना सारख्या महामारीच्या काळानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र हे अद्यावत करण्याची अत्यंत गरज होती. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज बाबा यांच्याकडे सुपनेतील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत करण्यासाठी निधी मागणीसाठी सतत सात ते आठ महिने या गोष्टीचा पाठपुरावा होता. सुपने गावासाठी बाबांनी कायमच विकास कामाच्या बाबतीत झुकते माप दिलेले आहे. त्यामुळे या निधीसाठी पृथ्वीराज बाबांचे सुपने ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करतो.
जगदीश बाळासाहेब पाटील (काॅंग्रेसचे युवा नेतृत्व)