सातारा जिल्ह्यात 1 हजार 168 जणांना डोळ्यांचा आजार : डाॅक्टर म्हणतायत…
सातारा | लोकांना डोळे येण्याची लागण होत आहे. हा आजार गंभीर स्वरुपाचा नसून योग्य ती काळजी घेतल्यास व त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यास हा आजार लगेच बरा होतो. लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य विभागशी संपर्क साधावा. आत्तापर्यंत 1 हजार 168 नागरिकांना लागण झाली असून 725 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे यांनी दिली.
डोळा आलेल्या रुग्णांमध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळयाला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. या व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करायला हवा. तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे नियमित हात धुणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. शाळा, वसतिगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलांना किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे.
ग्राम स्तरावर ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यासाठी पूर्णतः मोफत उपचार उपलब्ध आहेत, याचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. खलिपे यांनी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधावा.