दुशेरे सोसायटीत अध्यक्षपदाच्या निवडीत 1 मत फुटल्याने सत्तेतील काॅंग्रेसला धक्का : अध्यक्षपद भोसले गटाला
कराड | तालुक्यातील दुशेरे विकास सेवा सोसायटी काॅंग्रेसची सत्ता असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्याने विरोधातील गट भारी ठरला. निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री नाट्यमय घडामोडी घडल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेस प्रणित सत्तेला कलाटणी मिळाली. सोसायटीची दिड वर्षापूर्वी निवडणूक झाली होती, यामध्ये कृष्णा साखर कारखान्याचे संचालक आणि डाॅ. अतुल भोसले समर्थक धोंडिराम जाधव यांच्या गटाला हादरा देत काॅंग्रेसने सत्तांतर केले होते. काँग्रेसला सात व धोंडिराम जाधव यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या होत्या. पहिले दीड वर्ष अध्यक्षपद मिळाल्यानंतर आता पुन्हा काॅंग्रेसलाच अध्यक्षपद मिळेल, असे असताना विरोधकांचा विजय मिळाल्याने नक्की काॅंग्रेसचा कोणता संचालक फुटला याबाबत आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
दुशेरे विकास सेवा सोसायटीसाठी काँग्रेसकडून भिमराव पवार यांना अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सुषमा जाधव यांना संधी देण्यात आली होती. काँग्रेसच्या गटाने ठरवलेल्या कालावधीनंतर भिमराव पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नूतन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सकाळी झाली. काल रात्री गावात राजकीय घडामोडी घडल्याने अध्यक्ष निवडीत धोंडिराम जाधव यांनी काँग्रेस प्रणित गटाला हादरा देत पुन्हा सत्तेच्या चाव्या ताब्यात घेतल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एस. थत्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत काँग्रेसकडून चंद्रकांत बाळासाहेब जाधव यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तर धोंडिराम जाधव यांच्या गटातून चंद्रकांत सर्जेराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. छाननीत अर्ज वैद्य ठरल्यानंतर मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतमोजणीवेळी काॅंग्रेसच्या जाधव यांना सहा मते मिळाली. तर चंद्रकांत पाटील यांना सात मते मिळाली. काॅंग्रेसच्या विरोधातील उमेदवाराला सात मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी थत्ते यांनी चंद्रकांत पाटील यांना विजय घोषित केले. विजयाची घोषणा होताच डाॅ. अतुल भोसले यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा धोंडिराम जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सिताराम जाधव, भास्करराव जाधव, शिवाजीराव गोपाळा जाधव, सर्व संचालक, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.