अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकाला 10 वर्षे सक्तमजुरी
कराड | अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयितास दहा वर्षे सक्त मजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी ही शिक्षा सुनावल्याची माहिती सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी दिली.
अधिक माहिती देताना राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले की, मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील संशयिताने तिच्याशी गोड बोलून, तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तसेच लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याचे समजले. त्यामुळे नातेवाईकांनी संशयीता विरोधात पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने राजेंद्र सी. शहा यांनी सहा साक्षीदार तपासले. डॉक्टर व पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयितास दहा वर्षे सक्त मजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरी असे शिक्षा सुनावली.