तळबीडला बिबट्याच्या हल्ल्यात 2 वासरे मालकाच्या डोळ्यादेखत ठार
कराड | पुणे- बंगळूर महामार्गालगत असणाऱ्या तळबीड गावच्या हद्दीत एमआयडीसी परिसरात 50 ते 60 गाईचा असलेल्या गोठ्यामध्ये मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन गीर जातीची वासरे मालकाच्या डोळ्यादेखत बिबट्याने ठार केली असून अंदाजे 30 ते 35 हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तळबीड एमआयडीसी परिसरात राजस्थान येथील देवजी रामा अहिर यांच्या वासरांवर मध्यरात्री 2 वाजता बिबट्याने हल्ला केला. यावेळी देवजी अहिर हे तेथेच झोपण्यासाठी होते, तेव्हा बांधलेल्या वासरावर बिबट्याने मालकाच्या डोळ्यादेखत हल्ला केला. तसेच घटनास्थळावरून बिबट्या हलत नसल्याने भितीचे वातावरण पहायला मिळत होते. देवजी अहिर यांच्यासह आठ ते दहा लोक सुमारे 50 ते 60 गाई घेऊन काही महिन्यांपूर्वी आले आहेत. एमआयडीसी परिसरातील डोंगरालगत त्यांचे वास्तव्य आहे. याच लोकांच्या दोन वासरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांसह परिसरातील विविध गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे शंभूराज माने यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी विशाल मोहिते, अधिक साळुंखे, सुरेश पाटणकर हे उपस्थित होते. तसेच वराडे वनविभागाचे श्री. कुंभार यांनी नुकसान भरपाई मिळवून देवू असे आश्वासनही दिले आहे.