कराडच्या पोलीस निरीक्षकाला 6 वर्षांनी जामीन मंजूर

कराड | जून २०१६ साली कराड शहर पोलिसांच्या ताब्यातील निंभोरे (ता. करमाळा) येथील रावसाहेब जाधव याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नातेवाईकांनी केलेल्या आरोपांमुळे याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सहा वर्षांपासून अटकेत असलेले कराडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विकास धस यांना उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे.
याबाबत माहिती अशी, 12 मे 2016 रोजी विक्रम श्रीमल जैन (रा. गोरेगाव, मुंबई) हे पुणे- बंगळूर महामार्गावरून खासगी बसने प्रवास करत होते. कराडजवळील टोल नाक्यावर तीन संशयितांनी त्यांची अडीच किलो सोने व 2 लाख 20 हजार रुपये असलेली बॅग चोरून नेली होती. याबाबत जैन यांनी कराड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी संशयावरून रावसाहेब जाधव आणि अनिल डिकोळे यांना ताब्यात घेतले होते. यातील संशयित जाधव यास कराडच्या कार्वे नाका पोलिस चौकीत ठेवले होते. मात्र, तपासादरम्यान प्रकृती खालावल्यामुळे त्याला कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. याचदरम्यान त्याचा मृत्यू झाला. जाधव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच हा मृत्यू झाल्याचा जाधव याच्या नातेवाईकांनी आरोप केला होता. तसेच काही लोकांनी कराड पोलिस ठाण्यासमोर आंदोलनही केले होते. पुढे या प्रकरणाचा तपास राज्य गुप्तचर विभागाकडे देण्यात आला होता. या प्रकरणी डिकोळेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिस निरिक्षक विकास धस, सहाय्यक पोलिस निरिक्षक हनुमंत कांकडकी यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढे सर्वांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर यापूर्वी टप्प्या टप्प्याने अटक केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना जामीन मंजूर झाला होता. गुरुवारी तत्कालीन पोलिस निरीक्षक विकास धस यांनाही जामीन मंजूर झाला आहे.