वडगावला साडेदहा कोटीची 24 बाय 7 पेयजल योजना
कराड | वडगाव हवेलीने परिसराला दिशा देण्याचे काम केले. माजी मंत्री दादासाहेब जगताप व दिनकरराव जगताप यांनी गाव व परिसराचा कायापालट केला. त्यांचा वारसा जगदीश जगताप जोपासत आहेत. त्यांचे नेतृत्व बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जगदीशदादांनी प्रयत्न करून गावासाठी पेयजल योजना खेचून आणली. चोवीस बाय सात, शुद्ध पाणी पुरवठा करणारी ही योजना आहे. ही योजना विभागात पथदर्शी ठरेल, असा विश्वास प्रदेश भाजपचे सदस्य अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
वडगाव हवेली येथे साडेदहा कोटी रुपये खर्चातून उभारल्या जाणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत पेयजल योजनेचे भूमिपूजन श्री. भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. भानुदास जगताप अध्यक्षस्थानी होते. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, सरपंच राजेंद्र जगताप, उपसरपंच सचिन चव्हाण, युवा नेते शिवराज जगताप, सत्यवान जगताप, श्रीरंग साळुंखे, दिलीप चव्हाण, ठेकेदार एस. एन. इंगवले, पी. एस. केंगार, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. जगदीश जगताप म्हणाले, याआधीच जागतिक बँकेच्या सहकार्यातून ही योजना झाली आहे. पाच वर्षात पाठपुरावा न झाल्याने ती रखडली होती. उद्यापासून योजनेचे काम सुरू होत आहे.
अतुल भोसले व जगदीशदादा यांच्यासहयोगाने योजना मंजुर
राजेंद्र जगताप म्हणाले, अतुल भोसले आणि जगदीशदादा यांच्या सहयोगाने ही योजना मंजुरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेतली. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचणार आहे. श्रीरंग साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब जगताप यांनी आभार मानले.