ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव कुस्ती संकुलास 25 कोटी 75 लाखांचा निधी
तत्कालीन तहसिलदार विजय पवार यांचा पाठपुरावा

कराड -: कराडचे तत्कालीन तहसीलदार विजय पवार यांच्या पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारातून पहिले कुस्तीत पदक मिळवून देणारे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने कुस्ती क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग सुकर झाला. या संकुलासाठी शासनाकडून रुपये २५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे १५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या या संकुलाचा मार्ग सुकर करण्यात विजय पवार या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. राज्याचे तत्कालीन क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांची गोळेश्वरला भेट घडवून आणत. क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला.
भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिलेल्या खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी गोळेश्वर (ता. कराड) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी कुस्तीप्रेमींसह कराडकरांची होती. खास बाब म्हणून सन २००९ मध्ये राज्य शासनाने त्याला मान्यता दिलेली होती. पण अपुरा निधी अन् अनेक अडचणीमुळे हे काम संरक्षक भिंतीपुरते झाले होते. कुस्ती संकुल उभारणीकरिता मौजे गोळेश्वर येथील जागा ग्रामपंचायतीने तालुका क्रीडा संकुल समिती, कराड यांच्याकडे वर्ग केलेली आहे. प्राप्त जागेवर क्रीडा सुविधा विकसित करण्याकरिता संचालनालयाच्या दि. ६ ऑगस्टच्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करून, १ कोटी वितरित करण्यात आलेले आहेत. परंतु, वितरित केलेला निधी संकुल उभारणीस कमी होता; तसेच प्राप्त जागेवर न्यायालयामध्ये ३ दावे होते. त्यापैकी शासनाविरुद्धात असलेले दोन दावे तक्रारदारांनी मागे घेतले. त्यानंतर जागेची अतितातडीचे मोजणी करून, या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अॅडमिन एरिया, किचन व डायनिंग, स्वच्छतागृह, जिम, व्हीआयपी रुम, टीम ए व बी रूम व स्वच्छतागृह, ऑडिओ व्हिजुअल रूम, फिल्ड ऑफ प्ले -०२ मॅट, मुलांची डॉमेन्ट्री, मुलींची डॉमेन्ट्री, सेपरेट टॉयलेट, प्रेक्षक गॅलरी (५०० आसन व्यवस्था) या सुविधा विकसित करण्याकरिता शासनास सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. या कामात तत्कालीन तहसिलदार विजय पवार यांनी मोलाचे योगदान दिले.
सादर करण्यात आलेल्या प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्यता देऊन २५ कोटी ७५ लाख निधी गोळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता मंजूर केलेला आहे. त्यामुळे क्रीडा संकुल उभारणीची सुमारे १५ वर्षांची प्रतीक्षा संपलेली असून, लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेत अनेकांनी हातभार लावला, कराडकरांनी अनेकदा निवेदन, उपोषण केले. मात्र, प्रशासकीय उदासिनता दूर करण्यात आणि प्रशासकीय अधिकारी काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे तत्कालीन तहसिलदार विजय पवार या संकुलानिमित्त कराडकरांच्या सदैव लक्षात राहतील हे मात्र नक्की.