सातारा जिल्ह्यातील धोंडेवाडीत भीषण अपघातात 4 जण ठार : देवदर्शनासाठी जाताना ओमनी झाडावर आदळली

सातारा। सातारा जिल्ह्यातील धोंडेवाडी (ता. खटाव) येथील पेट्रोल पंपानाजिक सुर्याचीवाडी हद्दीत आज पहाटे ओमनी गाडी झाडावर आदळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार, पाचजण जखमी झाले असून सर्वजण देवदर्शनासाठी निघालेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळू मामाच्या मेंढराचे एक देवस्थान लाकरेवाडी येथे असून ओमनी गाडीतून लोक देवदर्शनासाठी निघाले होते. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गाडी झाडावर आदळली. यामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले असून सर्व प्रवासी सिध्देश्वर कुरोली व बनपुरी येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.
पांडुरंग देशमुख यांच्या गाडीतून सर्वजण देवदर्शनासाठी निघाले होते. गाडीची धडक झाडाला एवढी भीषण होती की, गाडीचा चक्काचूर झाला असून गाडीचे दोन भाग झाल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर घटनास्थळी तातडीने पोलीसांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविले आहे. वडूज पोलिस अधिक माहिती घेत आहेत.