बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 5 जणांचे अर्ज दाखल
कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आजपासून धुमशान सुरू झाले असून अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या डाॅ. अतुल भोसले यांच्या समर्थकांनी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्याच दिवशी 5 जणांनी उमेदवार अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली आहे.
कराड उत्पन्न शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी कृषी पत व बहुउद्देशीय मतदार संघातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. (उमेदवार नांव व गांव) पुढीलप्रमाणे ः- विजयकुमार सुभाष कदम- (बाबरमाची), मोहनराव एकनाथ माने (चरेगाव), पद्मसिंह हणमंतराव जाधव (बैलबाजार शनिवार पेठ, कराड), जगदीश दिनकरराव जगताप (वडगांव हवेली), अनुप शामराव पाटील (वाठार) अशी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे आहेत.
आ. बाळासाहेब पाटील आणि डाॅ. अतुल भोसले यांच्यातील युती होण्याच्या दृष्टीने बैठका होवून तयारी झाली असल्याने राष्ट्रवादीकडून कोण आणि भोसले यांच्याकडून कोण-कोण अर्ज दाखल करणार याकडे कराड उत्तर व दक्षिण मतदार संघातील मतदारांसह कार्यकर्त्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खेळी काय असणार याकडे दोन्ही मतदार संघातील कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.