एकीव धबधब्याच्या कड्यावरून युवकांना ढकलणाऱ्या 5 संशयित ताब्यात : खूनाचा गुन्हा
सातारा | सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास परिसरातील एकिव धबधब्याच्या कड्यावरून दोन तरुणांना 700 ते 800 फूट खोल दरीत ढकलणाऱ्या 5 संशयितांना मेढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत दोघा युवकांचाही मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. सातारा तालुक्यातील बसप्पाचीवाडी व करंजे पेठ येथील अक्षय आंबवले व गणेश फडतरे अशी खून झालेल्या युवकाची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, रविवारी जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर फिरण्यासाठी चार युवक गेले होते. यावेळी काही जणांच्यात भांडणे झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले होते. भांडण सुरू असतानाच मुख्य धबधब्याच्या खालच्या बाजूला गेले असता दोघेजण 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळले असल्याचेही बोलले जात होते. मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्यासह त्यांची टीम संशयितांच्या शोधात होती.
साताऱ्यातील दोन्ही युवकांना धबधब्यावरून खाली ढकलणाऱ्या संशयित असिफ शेख, पप्पू कुंदन पवार, निखिल कोळेकर, साहिल शेख आणि सोनू खवळे यांना मेढा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर अजूनही या गुन्ह्यातील 5 संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. संशयितांना परजिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.