सैदापूरातील एकाची 50 लाखांची फसवणूक : साताऱ्यातील पती- पत्नीसह कराडातील एकावर गुन्हा

सातारा । इथेनॉल कंपनी सुरू करण्यासाठी कर्ज देण्याच्या आमिषाने कराड तालुक्यातील एकाची 50 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पती- पत्नीसह सैदापूरातील एकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील दोघांचा आणि कराड तालुक्यातील एकाचा यामध्ये समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर (ता. कराड) येथील एकास 50 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले किरण अधिकराव जाधव (रा. सैदापूर, ता. कराड) यांना जून 2022 मध्ये नरेंद्र चंद्रकांत जाधव, सोनाली नरेंद्र जाधव (रा. गडकर आळी शाहूपुरी, सातारा) तसेच महेश रामचंद्र यादव (रा. सच्चिदानंद कॉलनी, फार्मसी कॉलेजमागे, सैदापूर, कराड) यांनी भेट घेतली. त्या तिघांनी इथेनॉल कंपनी काढण्यासाठी कर्ज मिळवून देऊ, असे सांगितले.
त्यानुसार साताऱ्यातील राधिका रस्त्यावर असणाऱ्या एमके फायनान्स या नावाच्या कार्यालयात त्यांच्यात अनेकवेळा चर्चा झाल्या. चर्चेवेळी किरण जाधव यांनी त्या तिघांना वेळोवेळी पैसे दिले. सुमारे 50 लाख रुपये देऊनही त्या तिघांनी इथेनॉल कंपनी सुरू करण्यासाठीचे कर्ज किरण जाधव यांना दिले नाही. कर्ज तरी द्या, नाही तर घेतलेले पैसे तरी द्या, असा तगादा किरण जाधव यांनी त्या तिघांकडे लावला. तगादा लावूनही पैसे तसेच कर्ज मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे किरण जाधव यांच्या लक्षात आले. या फसवणूकीची तक्रार त्यांनी काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार नरेंद्र जाधव, सोनाली जाधव, महेश यादव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे करीत आहेत.