मोरणा शिक्षण मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 हजारांची मदत

पाटण | मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत संस्थेतील पदाधिकारी-कर्मचाऱ्यांनी उभी केली. या रकमेचा धनादेश पालकमंत्री शंभूराज देसाई व रविराज देसाई यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा अलीकडेच वाढदिवस संपन्न झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्सवी प्रथांना दूर सारून यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत उभी करण्याचे ठरवले. त्यातून रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी येथील, तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून संस्थेने 51 हजार रुपये निधी उभा केला.
यावेळी मोरणा शिक्षण संस्थेने दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी राबवलेल्या या विधायक उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संस्थेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे, अतुल सावे, अब्दुल सत्तार यांच्यासह अन्य आमदार उपस्थित होते.