उंब्रजजवळ 70 प्रवासी बचावले : वेगाने निघालेल्या एसटी बसचा टायर फुटला
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे- बंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसचा पुढील टायर फुटला. दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील सुमारे 70 प्रवासी बचावले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर प्रवाशांचा सुमारे तासभर खोळंबा झाला. अन्य एसटीच्या प्रतीक्षेत भर उन्हात प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले.
याबाबत अधिक माहिती शी, पुणे -बंगलोर महामार्गावर शिवडे गावचे हद्दीत मसुर फाटा येथे अंडरपास पुलाचे काम पूर्णत्वास आले असून पुलावरून मेढा- सातारा ते नरसिंहवाडी अशी प्रवासी घेऊन एसटी बस निघाली होती. एसटीत सुमारे 70 प्रवासी प्रवास करत होते. पुलाच्या उतारावर अचानक या बसचा पुढील क्लिनर बाजूचा टायर फुटला. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस नियंत्रितपणे रस्त्याकडेला आणून उभी केली.
महामार्गावर नेहमीच वाहनांचा वेग मोठा व संख्या मोठी असते. अशावेळी पूलावरून उताराला टायर फुटल्याने बसच्या चालकांने प्रसंगावधान दाखवत बस बाजूला घेतली. चालकांमुळे सर्व प्रवाशी सुखरूप बचावले तसेच त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान या घटनेनंतर बसमधील विद्यार्थी व इतर प्रवासांचा खोळंबा झाला.