कराड दक्षिणेत ९.९० कोटींची विकासकामे : खा. उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून निधी
कराड :- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात १३४ कोटी ३८ लाख रुपयांची विकासकामे होणार असून, यापैकी कराड दक्षिणमध्ये ९ कोटी ९० लाख रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. भारतीय जनता पक्षाचे सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला आहे.
कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यानुसार त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कराड दक्षिणमधील रस्ते विकासाच्या कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार ९ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून साकारण्यात येत असलेले एम.आर.एल. १० एन. एच. ४ ते गोटे विजयनगर ते बिरोबा मंदिर ते विमानतळ रोड (२ कोटी ५३ लाख) आणि एम.आर.एल. ११ कोडोली ते वडगाव हवेली ते गणेश नगर रोड (४ कोटी ४१ लाख) ही दोन कामे प्रगतीपथावर आहेत. तर एम.आर.एल. २३ एन. एच. १६ ते गोवारे सयापुर टेम्भू एस. एच. १४२ ए रोड (२ कोटी ९४ लाख) हे काम निविदा प्रक्रिया स्तरावर आहे. या कामांमुळे या भागातील दळणवळणाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.