कोयना धरणात 91.21 TMC पाणी : महाबळेश्वरला पाऊस चांगला
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा रिमझिम पडण्यास सुरूवात केली आहे. अजूनही अपेक्षित पाऊस पडत नसल्याने कोयना धरण केव्हा भरणार याकडे शेतकऱ्यांसह नदीकाठच्या गावच्या नजरा लागून राहिल्या आहेत. कोयना धरण परिसरात जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात धुवांधार पावसाने हजेरी लावल्याने धरणात मोठा पाणीसाठा झाला. मात्र, महिनाभरात अवघा 5 ते 6 टीएमसी पाणी वाढले आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात कोयना धरण परिसरात पावसाने रिमझिम सुरू केली आहे. कोयना धरणात सध्या 91. 21 टीएमसी पाणीसाठा आहे. महाबळेश्वरला पावसाची चांगलीच हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात इतर ठिकाणी केवळ आभाळच असल्याचे पहायला मिळत आहे.
कोयनेत 91. 21 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात शनिवारी (दि. 23) सायंकाळी 5 वाजेपर्यंत 91.21 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळपासून सायंकाळपर्यंत कोयनेला- 4 मिलीमीटर, नवजा- 1 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 24 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 3902, नवजा- 5527 आणि महाबळेश्वरला- 5312 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात प्रतिसेंकद 4 हजार 995 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात 2 हजार 100 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनो ई- पीक नोंद करा अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही
शेतकऱ्यांनो ई- पीक नोंद करा अन्यथा दुष्काळ पडल्यास तसेच शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारने सर्व योजना या ई- पीक नोंद असेल तरच मिळणार आहेत. तेव्हा अत्यंत सोपी पध्दत असलेली ई- पीक नोंद करावी. ई- पीक नोंद केल्यास तुमच्या शेतातील पिकाची नोंद थेट सातबाऱ्यावर होते. तसेच कोणते पीक शेतात आहे आणि त्याचे नुकसान झाल्यास थेट शासनाला समजते. तालुक्यात सध्या 40 टक्के ई-पीक नोंदणी झाली असून 30 सप्टेंबर सर्व शेतकऱ्यांनी नोंद करावी. शेतकऱ्यांनी 1 रूपयेत पिकविमा घेतला असला तरी ई- पीक नोंद नसल्यास त्यांना भरपाई मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो ई- पीक नोंद करा असे आवाहन प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले आहे.