शासकीय योजनांची जत्रा : एकाच दिवशी 75 हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ
सातारा | शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा एकाच दिवशी किमान 75 हजार लाभार्थ्याना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांच्या जत्रेचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यात संपन्न होणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात शासकीय योजनांची जत्रा या विषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी या जत्रे विषयी माहिती देताना याच्या आयोजनाबाबत सर्व संबंधित विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
सर्व विभागांनी शासकीय योजनांची जत्रा हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मिशन मोडवर काम करावे अशा सूचना करून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, शासकीय योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये कृषि, महिला व बालविकास, ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, रोजगार, जिल्हा उद्योग केंद्र यासह विविध महामंडळांकडील योजनांचा प्रामुख्याने समावेश आहे. या विभागांनी त्यांच्या पात्र लाभार्थ्यांना योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लोकांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने आठवडी बाजारांच्या ठिकाणी माहिती कक्ष स्थापन करणे, योजनांची माहिती देणारी बॅनर्स उभारणे, ग्राम पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहचणे तर शहरी भागात नगर पंचायत, नगर परिषदा व नगर पालिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून योजना जनतेपर्यंत पोहचवणे अशा प्रकारे काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
योजनांची गतीमान अंमलबजावणी करण्याचाही उद्देश या अभियानाचा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये आपण पोहचले पाहिजे. घरकुलासारख्या योजना असोत किंवा महामंडळातर्फे विविध प्रकारच्या अर्थसहाय्य योजना असोत त्याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे. फक्त माहिती देऊन न थांबता पात्र लाभार्थ्यांना योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठीही काम केले पाहिजे. एखादा लाभार्थ्यी जर अनेक विभागांकडून मिळणाऱ्या योजनेसाठी पात्र ठरत असेल तर त्यास त्या योजनांचा लाभ दिला पाहिजे. एकाच दिवशी पात्र लाभार्थ्यांना योजना मंजुरीची पत्रे देण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांशी संपर्कसाधून लाभ देण्यासाठी करावयाच्या कार्यवाहींची पुर्तता त्यांच्या स्तरावर करुन घ्यावी. तसेच काही अडचणी असल्यास त्या समन्वयाने सोडवाव्यात. येत्या 20 दिवसात आपल्याला हे उद्दीष्ट साध्य करावयाचे आहे. तसेच पुढील वर्षभर ही जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचवण्यासाठी काम करावयाचे असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात पुढील महिन्यात शासकीय योजनांची जत्रा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी एकाच दिवशी 75 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची मंजुरी पत्रे, प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.