साताऱ्यात महसूल विभागात खळबळ : मंडलाधिकाऱ्यानंतर तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात
सातारा | सातारा जिल्ह्यात कराडला मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याची घटना ताजी असताना खटाव तालुक्यात तलाठी सापडला आहे. त्यामुळे महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली. तक्रारदाराकडून 10 हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. जय रामदास बर्गे (वय- 32, पद – तलाठी,वर्ग 3, डिस्कळ, ता.खटाव, रा.कोरेगाव- सुभाष नगर ता.कोरेगाव) असे संशयित तलाठ्याचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, एका 19 वर्षीय तक्रारदार यांचे जमिनीची खातेफोड नोंद धरून सातबारा उतारा देणे करिता सुरुवातीला 20 हजार रूपयांची मागणी करून यापूर्वीच 10 हजार रूपये घेतलेले होते. आता पुन्हा 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 5 हजार रुपये शेजारील अजय बाळकृष्ण शिपटे यांचे झेरॉक्स दुकानामध्ये ठेवायला सांगितले. थोड्या वेळातच तेथे येऊन तक्रारदार यांनी समोरचे काउंटर वर ठेवलेली लाच रक्कम ताब्यात घेत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
ला प्र वि पुणे परिक्षेत्र पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षकसुरज गुरव, पोलिस उप अधीक्षक श्रीमती उज्वल अरुण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सचिन राऊत, पो. नाईक गणेश ताठे, निलेश येवले यांनी केली.