राष्ट्रवादीचा स्वबळाचा, महाविकास आघाडीचा नारा : आ. बाळासाहेब पाटील यांच्यापुढे पेच?
कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
राष्ट्रवादी काॅंग्रेसने जिथे ताकद आहे, तिथे स्वबळावर, तर इतर ठिकाणी महाआघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीत घेतला. बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा निर्धार पक्षाच्या आमदारांनी केला आहे. परंतु कराड बाजार समितीत आ. बाळासाहेब पाटील यांच्यापुढे आता पेच निर्माण झाला आहे, तो कसा सोडवणार याकडे कराड उत्तर व दक्षिण मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे डाॅ. अतुल भोसले आणि आ. बाळासाहेब पाटील यांची युतीसाठी बैठकी झाल्या अर्ज दाखल सुरू होण्यास सुरूवात झाली आहे. अशावेळी राष्ट्रवादी पक्षाने स्वबळाचा नारा किंवा महाविकास आघाडीचा पर्यायचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी भवनात बाजार समितीच्या निवडणुकीसाठीची नियोजन बैठक पार पडली. सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, फलटण, पाटण, कोरेगाव, वडूज, वाई, वडूज, लोणंद याठिकाणी निवडणूक लागली आहे. यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर, राजाभाऊ उंडाळकर, सारंग पाटील, प्रदीप विधाते, मनोज पोळ, बाळासाहेब सोळसकर, राजकुमार पाटील, नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, अभयसिंह जगताप, बाळासाहेब सावंत, सतीश चव्हाण, कविता म्हेत्रे, संजना जगदाळे, समिंद्रा जाधव, स्मिता देशमुख, सीमा जाधव, नलिनी जाधव, हेमलता निंबाळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीची कुठे- काय परिस्थिती अन् रणनिती
कोरेगाव बाजार समितीत राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढेल. येथे महाविकास आघाडीची त्यांना साथ मिळावी. यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. फलटण बाजार समितीत आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर यांचे राजे गटाचे स्वतंत्र पॅनेल असेल. वाई, लोणंद व जावळी- महाबळेश्वर या तीन बाजार समितींच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांना लक्ष घालावे लागणार आहे. येथे राष्ट्रवादी स्वबळावर तर सातारा बाजार समितीत राष्ट्रवादीची ताकद नाही, त्यामुळे येथे अन्य कोणासोबत युती करून निवडणूक लढता येते का, याची चाचपणी होणार आहे. पाटणला विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे पॅनेल उभे राहू शकते का, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मेढा बाजार समितीत दीपक पवार यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी एकत्रितपणे पॅनेल टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. कराड बाजार समितीत बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे पॅनेल टाकणार आहेत. खटाव बाजार समितीत काँग्रेससोबत राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा प्रयोग करेल. तो यशस्वी न झाल्यास स्वबळावर लढणार आहे. एकूणच बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्यांने घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा निर्धार आमदारांनी केला आहे.