तेमटेवाडीत आगीत घराची अन् पैशाची राखरांगोळी : 15 लाखांचे नुकसान

ढेबेवाडी | पाटण तालुक्यातील काळगाव पासून 3 ते 4 किमी अंतरावर असलेल्या तेटमेवाडी या वाडीमध्ये यशवंत महादेव तेटमे (वय- 75 वर्षे) यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. यशवंत तेटमे हे आपली पत्नी सौ.तारुबाई तेटमे गावी राहतात त्यांची दोन मुले आणि सुना मुंबईला राहतात. मंगळवार दुपारी 12.30 च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
सदर घटनेचा नोंद ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे हवालदार शेळके, तसेच काळगांवचे तलाठी वैभव शितोळे, कदम आण्णा यांनी घेतली आहे. यावेळी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, यशवंत तेटमे, सौ.पारुबाई तेटमे, पोलीस पाटील पांडूरंग तेटमे व अन्य उपस्थित होते. या आगीत संसारोपयोगी वस्तू, धान्याची पोती, रोख रक्कम, दाग दागिने व इतर मालमत्ता असा सुमारे 15 लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यशवंत तेटमे यांचे घर एका बाजूला आहे. घराच्या जवळ असलेली गवताची गंज देखील जळून खाक झाली आहे. यशवंत तेटमे यांना आग लागल्यानंतर शेजारील महिलेने धरुन बाहेर आणले. तर त्यांच्य पत्नी सौ.तारुबाई या जवळच असलेल्या मस्करवाडी या गावामध्ये नातेवाईकांच्या लग्नाला गेल्या होत्या. त्या आल्यानंतर त्यांना आपल्या घराची राख झालेली पाहून धक्काच बसला.
तेटमे परिवाराच्या अंगावर असलेले कपडेच फक्त शिल्लक राहिले आहेत. बाकी सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आयुष्यभर काडी काडी जोडून उभा केलेला संसार डोळ्यादेखत जळून खाक झाला आहे. प्रचंड वारा आणि कडक ऊन यामुळे सदर आग वेळीच विझवणे शक्य झाले नाही. उभं घर जळताना पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा आपोआपच पाणावल्या. आगीमुळे फक्त घराच्या भिंती आणि लोखंडी अँगलच शिल्लक राहिले आहेत.
साधारणपणे 200 माणसांचे असणारे हे गाव. या गावातील बहुतांशी लोक नोकरी, कामा धंद्यानित्ति मुंबईलाच असतात.
शेळ्या विकलेल्या पैशांची झाली राखरांगोळी
तेटमे परिवाराने आपल्या मुलांना हातभार लागावा म्हणून शेळी आणि म्हैस पाळल्या होत्या. त्यापैकी एक म्हैस आहे. तर सर्व शेळया मागील आठवड्यात शेळ्या विकून आलेले पैसे घरात ठेवले होते. तसेच घराच्या बाजूला एक शेड बांधण्यासाठी मुंबईवरुन काही पैसे घरी ठेवले होते. या सर्व पैसे जळून खाक झाले आहेत.



