कोपर्डे हवेलीचे नेताजी चव्हाण पुन्हा सरपंचपदी

कराड । कोपर्डे हवेली येथील सरपंच नेताजी रामचंद्र चव्हाण यांचेवर सरकारी जागेमध्ये अतिक्रमण प्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाईला अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे नेताजी चव्हाण पुन्हा एकदा सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील सरपंच नेताजी चव्हाण यांच्यावर सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केल्याची तक्रार शरद चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली होती. यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागवून अपात्रतेचे आदेश दिले. त्यामुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली होती. या कारवाईला नेताजी चव्हाण यांनी आव्हान देत पुणे आयुक्तांकडे अपील करुन दाद मागितली होती. दि. 29 रोजी पुणे आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत कारवाईला नेताजी चव्हाण यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिली असून नेताजी चव्हाण लवकरच कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
सदरच्या कारवाईबाबत आपण पुणे विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. त्यानुसार त्यांच्याकडून योग्य न्याय मिळाला आहे. विरोधकांनी खालच्या पातळीवरील राजकारण सोडून गावच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन नेताजी चव्हाण यांनी केले आहे.