Video महाबळेश्वरला गारपीट : सातारा, वाई, जावली, कोरेगावला वादळी वाऱ्यासह पाऊस
सातारा | सातारा, वाई, जावली, कोरेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह तर महाबळेश्वर- पाचगणीत गारपीट झाल्याने जमिनीवर गारांचा खच पडला होता. कराड व पाटण तालुक्यात ढगाळ वातावणांसह काही ठिकाणी पावसाचे थेंब पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.
सातारा शहरासह ग्रामीण भागात आज 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने ग्रामीण भागातील सामान्य जनतेची चांगली तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते.
महाबळेश्वर व पाचगणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज महाबळेश्वर मध्ये गारपीट पडल्याने जमिनीवर गारांचा खच दिसून आला. गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वर परिसरातील वातावरण ढगाळ असून सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटसह ढगांचा मोठमोठाला आवाज यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. यातच आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पाऊस पडला. या पावसाबरोबरच गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. या गारपिटीने स्ट्रॉबेरी पिकाचं नुकसान झालं.