गोटेवाडी सोसायटीत बोगस सह्या, खोटी कागदपत्रे करणाऱ्यावर गुन्हा
कराड | बोगस सह्या करून खोटी कागदपत्रे तयार करीत फसवणूक केल्याप्रकरणी गोटेवाडी सोसायटीच्या तत्कालिन अध्यक्ष आणि सचिवावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोसायटीचे संचालक राजाराम सखाराम हिनुकले यांनी याबाबतची फिर्याद दिली.सोसायटी सचिव हनुमंत सदाशिव हावरे (रा. मनव) आणि तत्कालिन अध्यक्ष सुनील तुकाराम जाधव (रा. गोटेवाडी) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोसायटीचे संचालक राजाराम हिनुकले यांनी उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष सुनील जाधव आणि सचिव हनुमंत हावरे या दोघांनी खोटी कागदपत्रे तयार केली. त्या कागदपत्रावर खोट्या सह्या करून संचालक मंडळाची सभा बोलविल्याची बनावट नोटीस तयार केली. याबाबत राजाराम हिनुकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अली अहमद मुल्ला तपास करतायत.