सकाळ- सकाळी वृध्दाला सव्वा लाखांला गंडवले

सातारा | कोरेगाव तालुक्यातील भामटवाडी गावच्या हद्दीत दुचाकीवरील दोघा अज्ञात इसमांनी पोलिस असल्याची बतावणी करत एका वृध्दाला गंडवले. वडाचीवाडी ते खिरखंडी रस्त्यावर एकाची 1 लाख 20 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पळवली. सकाळ- सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पांडुरंग बाळू संकपाळ (वय- 63, व्यवसाय, शेती, रा. खिरखंडी, ता. कोरेगाव) हे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून वडाचीवाडी फाटा ते खिरखंडी जाणाऱ्या रस्त्याने घरी चालले होते. यावेळी भाटमवाडी येथील पेट्रोलपंपाजवळ दुचाकीवर दोघे अज्ञात थांबले होते. त्यांनी पांडुरंग संकपाळ यांची दुचाकी थांबवली.
अंदाजे 35 ते 40 वय असलेल्या दोघांनी दुचाकीवर येवून संकपाळ यांची दुचाकी थांबवली. आम्ही पोलिस आहोत. आम्हाला मदत करा, अशी बतावणी करून विश्वास संपादन करत संकपाळ यांच्याकडील दोन तोळे वजनाची 1 लाख 20 हजार रुपये किमतीची एक सोन्याची चेन पळविली. अधिक तपास सहायक फौजदार फरांदे करत आहेत.