Video ढेबेवाडी, उंडाळे विभागाला अवकाळी पावसाचा तडाखा : घराचे पत्रे उडाले
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्याला रविवारी वादळी पावसाने झोडपून काढले. दुपारनंतर विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. श्री. क्षेत्र नाईकबा येथे दर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेल्या भाविकांची पावसाने तारांबळ उडवली. पार्किंग क्षेत्रात लावलेली वाहने अडकून पडल्याने धावपळ झाली. विभागातील काही ठिकाणी घरांचेही वादळाने नुकसान झाले.
रविवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने ढेबेवाडी विभागात सुरूवात केली. त्यात लग्नमुहूर्त असल्याने पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली. मंद्रुळकोळे येथील कृष्णात यादव यांच्या घराचे पत्रे वादळाने उडून नुकसान झाले, तसेच अन्य काही गावातही नुकसानीच्या घटना घडल्याची माहिती मिळाली. येथील बाजारपेठेत बसस्थानक परिसरातील चौकात रस्त्याला गुडघाभर पाणी वाहत होते. पावसामुळे ओढेही खळखळून वाहिले. श्री. क्षेत्र नाईकबा यात्रेनंतरच्या पाच पाकाळण्या गेल्या रविवारी संपल्या आहेत. मात्र, उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांचा ओघ कायम वाढता आहे. रविवार असल्याने दर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेल्या भाविकांची पावसाने तारांबळ उडाली.
वाहने पार्किंग केलेल्या ठिकाणी अडकून राहिली. विक्रेत्यांचीही मोठी धावपळ झाली. पावसामुळे ठिकठिकाणी आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडाखाली कैऱ्याचा सडा पडल्याचे दिसून आले. आजच्या पावसामुळे खरीप पेरणीपूर्व मशागती सुलभ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उंडाळे येथे आठवडी बाजार रविवारी भरत असून दुपारनंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे ग्राहक व विक्रेते यांची मोठी धांदल उडाली.