Video पाटण तालुक्यात चार घरे जळून खाक : साडेसोळा लाखांचे नुकसान
पाटण | कुंभारगाव विभागातील शेंडेवाडी (ता. पाटण) पवारवाडीत रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली. आगीत घरांसह धान्य, कपडे, भांडी व प्रापंचिक साहित्य जळाल्याने सुमारे साडेसोळा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल यंत्रणेच्या पंचनाम्यात वर्तविण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, शेंडेवाडी ग्रामपंचायतीच्या कक्षेतील सुमारे अडीचशे लोकवस्तीच्या पवारवाडीतील पवार कुटुंबीयांच्या घराला आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. घरातील महिलांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थ व युवकांनी धाव घेऊन पेटत्या घराच्या छपरावर चढून कौले व पत्रे काढून आत पाण्याचा मारा सुरू केला. सरपंच राहुल मोरे व युवकांनी पेटत्या घरात शिरून गॅस सिलिंडर धाडसाने बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. कराड व पाटणहून पाचारण केलेले अग्निशमन दल वाहतुकीची कोंडी भेदत आडवळणीच्या मार्गाने घटनास्थळी पोचेपर्यंत चारही घरे जळून मोठे नुकसान झाले होते.
भरवस्तीत आग लागल्याने दाटीवाटीने असलेली आजूबाजूची अनेक घरे वाचविण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, ग्रामस्थ व युवकांच्या शर्थीच्या प्रयत्नाने मोठी हानी टाळणे शक्य झाले. मंडल अधिकारी एस. जे. जांगडे, तलाठी डी. जी. कोडाप्पे, दीपक इंगवले आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. लक्ष्मण बाबूराव पवार यांचे 4 लाख 30 हजार रुपयांचे, दादू सखाराम पवार यांचे 4 लाखांचे, हरिबा ज्ञानदेव पवार यांचे 3 लाख 85 हजार रुपयांचे आणि श्यामराव सखाराम पवार यांचे 4 लाख 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पंचनाम्यात वर्तविला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.