बंटी- बबली मामा- भाच्याचा कारनामा उघडकीस : घरफोडी, दुचाकी चोरी
सातारा | सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या मामा- भाच्याचा भुईंज पोलिसांनी पर्दापाश केला आहे. या कारवाईत 2 घरफोडीचे आणि 8 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भाचा योगेश संदीप बाबर (वय- 19, रा. उडतारे, ता. वाई) आणि मामा रमेश दिनकर दुदुस्कर (वय- 40, रा. सोनगाव, ता. जावळी) या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची अधिक माहिती पोलीसांनी दिलेली अशी, 24 फेब्रुवारी 2023 रोजी भरदिवसा फिर्यादी शुभांगी संजय साबळे (वय- 40. रा. उडतारे ता. वाई) या शेतात गेल्या असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने देवळीत ठेवलेली घराची चावी घेवुन घरातील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्हा उडतारे गावातीलच योगेश संदीप बाबर या अभिलेखावरील गुन्हेगाराने केला असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यास गुन्ह्यात अटक करुन विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने त्याचा मामा रमेश दिनकर दुदुस्कर याचेकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे त्याच्या मामाला गुन्ह्यात अटक करण्यात आली. मामाकडे अधिक तपास केला असता नमुद दोन्ही आरोपींकडुन भुईंज पोलीस ठाणे हद्दीत घडलेला आणखी एक घरफोडी चोरीचा गुन्हा तसेच भुईंज पो स्टे 2 मोटारसायकल चोरीचे 4 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. अटक आरोपींकडे आणखी सखोल तपास केला असता त्यांनी मेढा तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटारसायकल चोरी करणा-या आरोपींबाबत माहिती मिळाली. सदर परिसरातील 2 संशयीत आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता, त्यांनी सातारा तालुका पो स्टे 2 व मेढा पो स्टे 2 अशा 4 मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांची कबुली देवुन चोरीच्या मोटारसायकल काढुन दिल्या आहेत.
अशा प्रकारे गुन्ह्याचे तपासादरम्यान घरफोडी चोरीचे 2 गुन्हे उघड करून 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे 4 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच मोटारसायकल चोरीचे 8 गुन्हे उघड करुन 4 लाख रुपये किमतीच्या 8 चोरीच्या मोटारसायकल असा एकुण 6 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या ताब्यातुन हिरो होंडा कंपनीच्या 5 दुचाकी, सुझुकी कंपनीची 1 तर हिरो कंपनीच्या 2 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, वाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शीतल जानवे- खराडे यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पोलीस उप-निरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस अंमलदार बापुराव धायगुडे, जितेंद्र इंगुळकर, आनंदा भोसले, शंकर घाडगे, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन वर नमुद भुईंज पोलीस स्टेशनच्या पथकाचे पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांनी अभिनंदन केले.