शेवटच्या उडीने आयुष्य संपवलं : पोहायला गेलेल्या 17 वर्षाचा मुलाचा मृत्यू

पाटण | तारळी नदीवर असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या ओंकार धर्मेंद्र लोहार (वय- 17) या मुलाचा बंधाऱ्यातील प्लेटमध्ये अडकल्याने मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सारा गाव बंधाऱ्यावर धावला, मात्र ओंकारला वाचवू शकले नाहीत. त्याच्या मृत्यूने अनेकांना चटका लावला. तर लोहार कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ओंकार हा मित्रांसह धनगरवाडीजवळील दुपारी चारच्या सुमारास पोहायला गेला होता. पट्टीचा पोहणाऱ्या ओंकारचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. शेवटची उडी मारून घरी जाऊ, या असे म्हणत त्याने उडी मारली. मात्र, तो वर आलाच नाही. मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी नातेवाइकांना कल्पना दिली. ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरूणांनी पाण्यात उड्या मारीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका दरवाजाजवळ त्याचा मृतदेह हाताला लागत होता; पण त्याचे दोन्ही पाय लोखंडी प्लेटमध्ये अडकले होते. त्यामुळे बंधाऱ्याच्या प्लेटा काढण्याशिवाय पर्याय नव्हता. मोठ्या दोराच्या साह्याने प्लेटा काढल्यावरच मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी बंधाऱ्यावर शेकडो युवक मदतीसाठी एकवटले होते. तब्बल तीन तासांनी मृतदेह हाताला लागला.
बंधाऱ्यावरील चुकीच्या कामामुळे जीव गेलाचा आरोप
कोल्हापूर पध्दतीचा बंधाऱ्यावर पाणी आडविण्यासाठी लोखंडी प्लेट लावून पाणी साठवले जाते. मात्र, दोन प्लेटमध्ये गॅप राहात असताना काढला गेला नव्हता. यामुळे पाण्याची गळती होत होती. याकडे अनेकदा लक्ष वेधले होते. तरीही संबधित अधिकारी व कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याने या प्लेटच्या गॅपमध्ये ओंकारचा पाय अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपस्थितांनी व नातेवाईकांनी केला.