Satara News आईचा फोन मुलाला अन् मुलगा धरणात बुडालेला : दोघांचे मृतदेह सापडले
सातारा । उरमोडी धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचे मृतदेह सोमवारी आढळून आले. सौरव सुनील चौधरी (वय- 22) व आकाश रामचंद्र साठे (वय- 20, दोघे रा. सदर बझार) अशी त्यांची नावे आहेत. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, सातारा तालुका पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने दोन्ही बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यात आला. धरणाच्या कडेला सतत मोबाईल वाजत असल्याने फिरायला आलेल्या कुटुंबाने फोन उचलल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला.
याबाबतची अधिक माहिती अशी, साैरव व आकाश हे दोघेही मित्र दुचाकीवरून पोहण्यासाठी उरमोडी धरणात गेले होते. त्याच्यासोबत अन्य कोणी नव्हते. परंतु, ते पोहत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एक कुटुंबीय गप्पा मारत बसले होते. त्यावेळी युवकांनी ठेवलेली कपडे कुटुंबियाच्या निदर्शनास आली, या वेळी त्या युवकाचा मोबाईल सतत वाजत होता. त्यांनी फोन उचलून युवक उरमोडी धरण परिसरात असल्याची माहिती दिली. मोबाईलवर समोर सौरभची आई होती, तिने घरी आरडाओरडा करत कुटुंबातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सौरवचा मोठा भाऊ गौरव व काही मित्र घटनास्थळी गेले. त्यांनी परिसरात पाहणी केली. मात्र, कोणी आढळून आले नाही. तोपर्यंत अंधार झाला होता.
रविवारी बुडालेले युवकांना स्थानिक ग्रामस्थ, कातकरी समाजातील काही व्यक्ती व कुटुंबीयांनी सकाळी शोधमोहीम सुरू केली. नऊच्या दरम्यान रेस्क्यू टीमचे काही सदस्य दाखल झाले. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनीही स्वतः बोटीत चढून शोध घेतला. नंतर बाराच्या सुमारास आकाशचा मृतदेह शोधण्यात यश आले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुसरा मृतदेह शोधून काढण्यात यश आले.