Video : पाल येथे खंडोबा मंदिरात भाविकांची गर्दी उसळली

कराड | महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पाल (ता. कराड) येथील खंडोबा मंदिरात रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. सुट्टीचा दिवस रविवार व पौर्णिमा असा योग साधून आल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
पाल येथील खंडोबा देवस्थानच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांसाठी रांगेतून दर्शनाची सोय करण्यात आली. तसेच पार्किंगची सुविधा करण्यात आली. यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत खंडेरायाचे दर्शन घेतले. पालीतील खंडोबा देवाचे भक्तगण राज्याच्या कानाकोपऱ्यात विखुरले आहेत. जानेवारीतील यात्रेबरोबरच पौर्णिमा व इतर सणासुदीच्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी हे भाविक गर्दी करतात.
आज रविवारी भाविकांची तुडुंब गर्दी मंदिर परिसरात झाली होती. यावेळी भाविकांनी खंडोबाच्या नावानं चांगभलं… यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष केला. कडाकाचा उन्हाळा सुरू असल्याने सकाळपासून भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. दुपारीसुध्दा भाविकांची दर्शनासाठी रांग होती. आता काही दिवसात शाळा, महाविद्यालये सुरू होणार असल्याने नोकरदार वर्ग आजच्या सुट्टीच्या दिवशी पाली येथे दर्शनासाठी आलेला दिसत होता.