मसूर- हेळगाव रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले : पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ
मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
चोर सोडून संन्यासाला फाशी या म्हणीचा प्रत्यय अनेकदा पोलीस स्टेशनला येत असतो. तोच प्रत्यय मसूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला आला. चोरट्यांनी वृध्द आईच्या गळ्यातील व कानातील सोने चोरीला गेले असल्याची फिर्याद द्यायला आलेल्या 50 वर्षीय मुलाला चक्क ताटकळत ठेवले. मसूर पोलीस ठाण्यातील या प्रकारामुळे पोलीस नक्की चोरांसाठी आहेत की लोकांसाठी असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कचरेवाडी (ता.कराड) येथील वृद्ध महिला मालन महादेव सुर्वे (वय- 70) या सकाळी रस्त्याने मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. या दरम्यान, दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या दोघांनी मालन सुर्वे यांना त्यांनी थांबण्यास सांगितले. दुचाकी चालवत असणाऱ्याने कराडला जाण्यासाठी हाच रस्ता जातो का असे विचारत असतानाच मागे बसलेल्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले व दुसरा हात कानातील कर्णफुलाना घातला. मालन सुर्वे यांनी जोराचा आरडाओरडा केल्याने मंगळसूत्राचा हातात आलेला निम्मा भाग घेत चोरट्यांनी मसूरच्या दिशेला धूम ठोकली.
मालन सुर्वे यांचा मुलगा सुधीर (वय- 50) हे सदर घटनेची नोंद मसूर पोलीसात देण्यासाठी गेले असता ठाण्याच्या आवारात बाहेर दोन पोलीस बसलेले होते. त्यांना घडलेल्या घटनेची सर्व माहिती दिली. त्यांची तक्रार लिहून न घेता त्या संदर्भात अर्ज लिहून आणण्यास सांगण्यात आले. दुकान जवळपास नसल्याने अर्ज लिहिण्यासाठी कागद घेण्यासाठी त्यांना अर्धा किलोमीटर एसटी बस स्थानक चौकापर्यंत पायपीट करावी लागली. अर्ज लिहिल्यावर परत पोलीस ठाण्यात सकाळी सव्वाअकरा वाजता आल्यावर परंतु तेथे साडे बारा वाजेपर्यंत कोणीही नव्हते. अखेर त्यांनी घरचा रस्ता पकडला. पुन्हा पोलीस ठाण्याला परतीची वारी करीत सदर घडलेल्या घटनेचा तक्रारी अर्ज दिला.
माजी पोलीस पाटलाच्या कुटुंबालाही पोलिसांचा न्याय नाही
कचरेवाडीच्या घडलेल्या घटनेतील मालन सुर्वे यांचे पती महादेव सुर्वे हे कचरेवाडीचे पंचवीस वर्षे पोलीस पाटील होते. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. समाजाची सेवा करणाऱ्या पोलीस पाटलांच्या कुटुंबावरही पोलिसांचा असा अनुभव येत असेल तर सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना काय न्याय मिळणार.अशी चर्चा ग्रामस्थात आहे.