विंग- धोंडेवाडी रस्त्यावर घरी सोडण्याच्या बहाण्याने महिलेला लुटले
कराड | दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने वाटेतच दुचाकी थांबवून अंधाराचा फायदा घेत येथील एका वयोवृद महिलेला चोरट्याने लुटले. श्रीमती शारदा आण्णा खबाले असे लुटलेल्या महिलेचे नाव आहे. कर्णफुले, कंठमाळ लंपास त्याने केली. विंग- धोंडेवाडी रस्त्यावर मोर माळ परिसरात काल सायंकाळी घडलेल्या घटनेने ग्रामस्थांत भितीचे वातावरण आहे. या घटनेची नोंद तालुका पोलीसात झाली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलीसाची माहिती अशी, आठवडा बाजार करून येथील शारदा खबाले ही महिला घरी परतत होती. विंग- धोंडेवाडी रस्त्यावर वाघझरा परिसरात वस्ती असल्याने रस्त्यावरून चालताना मागून आलेल्या दुचाकीस्वाराने तिच्या जवळ दुचाकी थांबवली. घरी सोडतो बहाणा केला. श्रीमती खबाले यांना दुचाकीवर बसवले. निलांडी वस्ती असल्याने वाटेतच अंधारात लघुशंकेसाठी दुचाकी थांबवली. जबरीने कर्णफुले हिसकावून घेतली. महिलेने त्यास यावेळी विरोध केला. दोघात झटापट झाली. मात्र चोरट्याने जबरीने गळ्यातील कंठीमाळ हिसाकावून घेत दुचाकीची गती वाढवून तेथून पोबारा केला. यावेळी महिलेने आरडाओरडा केला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधाशोध घेतली. मात्र, अंधारात चोरटा अढळून आला नाही. या घटनेमुळे त्या परिसरातील ग्रामस्थांत घबराहटीचे वातावरण आहे. घटनेची नोंद तालुका पोलीसात झाली आहे. पोलीस निरिक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा तपास श्रीमती दुधभाते करीत आहेत.