कोयना धरणात बारावीत शिकणाऱ्या युवकाचा बुडून मृत्यू : मृतदेह सापडला
पाटण | सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात बॅकवाॅटर परिसरात मित्रासोबत पोहायला गेलेल्या 22 वर्षीय युवक काल बुडाला होता. त्याचा आज सकाळी मृतदेह सापडला. अर्जुन शरद कदम (वय- 22, रा. गाडखोप, ता. पाटण) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, गाडखोप येथे गावी अर्जुन कदम हा सुट्टीसाठी आलेला होता. मंगळवारी दुपारी मित्रासोबत कोयना बॅंकवाॅटर परिसरात बाजे गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेला होता. यावेळी धरणातील गाळात अर्जुन कदम रूतून बसल्याचे समजताच गावातील ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेतली. युवकाला शोधण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले, मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात अपयश आले होते.
आज सकाळी अर्जुन कदम यांचा मृतदेह सापडला. त्याच्यावर गावच्या ग्रामस्थांनी, नातेवाईक व घरच्या लोकांनी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार केले. यामुळे गाडखोप गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद कोयना पोलीस ठाण्यात झाली आहे.