Satara News : स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू
पाटण | ढेबेवाडी (Dhebewadi) विभागातील काळगाव (ता. पाटण) येथाल युवकाचा विहिरीत (well) घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. रविराज दिलीप काळे (वय- 30) असे संबंधित मृत युवकाचे नाव आहे. विविध सामाजिक उपक्रमातून सक्रिय असलेल्या रविराजच्या मृत्यूमुळे काळगाव व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ढेबेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
याबाबतची माहिती अशी, काळगाव येथील रविराज काल दुपारी चारच्या सुमारास आंबे उतरण्यासाठी झेलणे आणण्यासाठी गावालगतच असलेल्या शिवारातील विहिरी जवळच्या शेडकडे गेला होता. मात्र, बराच वेळ झाला, तरी तो घराकडे परत न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी काही जण विहिरीकडे गेले असता, विहिरीमध्ये झेलने दिसून आले. शोध घेतल्यावर रविराज पाण्यात पडल्याचे आढळून आले. तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्याला गंभीर दुखापतही झालेली होती. ग्रामस्थ व नातेवाइकांनी तातडीने त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा काळगाव येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविराजने एमएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून, सध्या तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. हुशार, मनमिळाऊ रविराजचा काळगाव व परिसरात मित्र परिवार आहे. गावातील सार्वजनिक गणेश मंडळ व गोल्डन ग्रुपमध्ये तो सक्रिय होता. त्याच्या मागे आई-वडील, चुलते- चुलती बहिणी असा परिवार आहे. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत शेवाळे तपास करत आहेत.