कराडला डंपरच्या धडकेत उंडाळेतील कापड व्यावसायिक युवक जागीच ठार : युवती जखमी
कराड – कराड शहराजवळ सलग दुसऱ्या दिवशी अपघातात दुसरा बळी गेला आहे. कराड येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूकीवर मोठा परिणाम होत आहे. काल मलकापूर हद्दीत रस्ता क्राॅस करताना सांगली जिल्ह्यातील एका महिलेला कंटेनरने चिरडले होते, तर आज पाटण तिकाटणे येथे डंपरच्या चाकाखाली एका दुचाकीस्वाराचा बळी गेला. उंडाळे येथील कापड व्यावसायिक जयदीप जयसिंग खुडे (वय- 28, रा. साळशिरंबे- खुडेवाडी, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सोबत दुचाकीवरील 23 वर्षीय युवती जखमी झालेली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तिकटणे (वारूंजी फाटा) येथील उड्डाणपूलाखालून डंपर कराड शहरात जाण्यासाठी कोल्हापूर नाक्याच्या दिशेला निघाला होता. यावेळी सेवा रस्त्यावर दुचाकी आणि डंपरचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी क्रमांक (एमएच-11- बीसी- 2171) आणि डंपर क्रमांक (एमएच-17- एजी- 9713) याचा अपघात झाला. यामध्ये जयदीप खुडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेली युवती ही दुचाकीवरून उडून दुसऱ्या बाजूला पडल्याने तिच्या पायाला दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकारी अमित बाबर, धीरज चतुर, श्री. जाधव, डीपी जैन कंपनीचे पीआरपो दस्तगीर आगा हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तात्काळ जखमीला उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात हलविले. तर रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत केली. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.