कराड तालुक्यातील चार गावात 12 ते 15 ठिकाणी एका रात्रीत घरफोडी

कराड | तालुक्यातील उंडाळे विभागातील 4 गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एका रात्रीत उंडाळे परिसरातील 12 ते 15 घरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. अधिकची माहिती कराड तालुका पोलिस घेत असून घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले आहे
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड दक्षिण मतदार संघातील मोठी महत्वाची गावे असलेल्या उंडाळे, येळगाव, टाळगाव, ओंड येथे बंद असलेली जवळपास 12 ते 15 घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत येळगाव येथे एक ज्वेलर्सचे दुकानही फोडण्यात आले. रात्री लाईट नसताना हा सर्व प्रकार घडला असून बंद घरे फोडल्याने चोरीची घटना लवकर लोकांना समजली नव्हती. या चोरीच्या घटनेमुळे उंडाळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, अर्चना शिंदे, यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर श्वान पथकही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. चोरट्यांनी एकाच रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरीचा प्रयत्न केल्याने लोकांच्यात घबराट आहे.