Satara News : मैत्रिणींच्या सोबतच्या युवकाचा डाॅक्टर नसल्याने गोळीबार
सातारा । शहराजवळील देगाव फाटा परिसरातील समर्थनगरमधील डॉ. सुखदेव आपटे यांच्या दवाखान्याबाहेर आज दुपारी चारच्या सुमारास एका युवकाने गोळीबार केला. गोळीबार केल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत संशयितांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान पोलिसांनी खेड – सातारा) भागातून गोळीबार करणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले आहे. दोन मैत्रिणींना घेवून आलेल्या युवकाने दवाखान्यात डाॅक्टर नसल्याने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा-रहिमतपूर रोडवरील देगावफाटा परिसरात डॉ. सुखदेव आपटे यांचा दवाखाना आहे. दुपारी या दवाखान्यात महिला सहायक कार्यरत होती. चारच्या सुमारास खेड भागातील संशयित युवक दुचाकीवरून दवाखान्याजवळ आला. यावेळी त्याच्यासोबत दोन युवती होत्या. दुचाकी रस्त्यावर लावून दोन युवतींना बाहेर थांबवत तो दवाखान्यात आला. त्याने अपघातात हाताला दुखापत झाली असून, उपचार करायचे आहेत, डॉक्टर आहेत का?, अशी विचारणा त्या महिला सहायकाकडे केली. त्यावर त्या महिला सहायकाने डॉक्टर पाचनंतर येतील, अशी माहिती त्या युवकास दिली. यानंतर तो युवक दवाखान्याबाहेर आला. त्याने सोबत असणाऱ्या दोन युवतींपैकी एका युवतीकडून पिस्तूल घेत रस्त्यावर येऊन गोळी झाडली.
गोळीच्या आवाजाने दवाखान्यातील महिला बाहेर आली आवाजाचा कानोसा घेतला असता, डॉक्टरांची चौकशी करणारा युवक दोन युवतींसोबत त्याठिकाणी उभा असल्याचे दिसले. थोड्या वेळानंतर तो युवक दोन युवतीसमवेत एकाच दुचाकीवरून निघून गेला. यानंतर त्या महिलेने याची माहिती डॉक्टरांना दिली. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार शहा, स्थागुशाचे निरीक्षक अरुण देवकर व इतर अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. घटनास्थळ पाहणी करून दोन तासांच्या आतच सातारा शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोळीबार करणाऱ्या संशयित युवकास खेड – सातारा येथून ताब्यात घेतले.