चालकाचा मृतदेह सापडला : विहे येथे काल विहीरीत क्रुझर कोसळली
पाटण । कराड- पाटण मार्गावर भरधाव वेगातील चारचाकी क्रुझर गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उसाच्या शेतातून पलीकडे जाऊन विहिरीत कोसळल्याची घटना काल मंगळावारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली होती. विहे (ता. पाटण) गावच्या हद्दीत कुंभारकी नावाच्या शिवारात रस्त्याकडेला हा अपघात झाला होता. दरम्यान, क्रूझर गाडी पोलिस व विहे ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे तीन तास अथक प्रयत्न करून क्रेनच्या साह्याने विहिरीतून बाहेर काढण्यात रात्री यश आले होते. मात्र, पाऊस सुरू असल्याने व रात्री अंधार पडल्याने चालकाचा शोध घेण्याचे काम थांबविण्यात आले होते. अखेर बुधवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास चालक संभाजी कृष्णा पवार (वय- 50, रा. मल्हारपेठ, ता. पाटण) यांचा मृतदेह आढळून आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराडहून मल्हारपेठकडे जात असताना मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास क्रूझर गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असणान्या उसाच्या शेतातून पलीकडे जाऊन पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये सुमारे 30 ते 35 फूट खोल गाडी कोसळली. दरम्यान, सदर घटना समजताच या ठिकाणी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी झाली. विहे ग्रामस्थ व मल्हारपेठ पोलिसांनी विहिरीमध्ये गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोल पाण्यात गाडी बुडाल्याने याबाबत काही अंदाज लागत नव्हता. अखेर विहिरीतून अपघातग्रस्त गाडी काढण्यासाठी क्रेन बोलविण्यात आलो. विहे ग्रामस्थ आणि पोलिसांनी क्रेनच्या मदतीने विहिरीतून गाडी वर काढली. गाडी वर काढण्यात आल्यानंतर गाडीचा क्रमांक (एमएच- 50 ए- 6261) असल्याचे निदर्शनास आले. मात्र, गाडीमध्ये कोणीही आढळून न आल्याने या अपघातातील लोकांची संख्या समजू शकत नव्हती.
अपघातातील अपघातग्रस्त नक्की कोणत्या अवस्थेत असतील याबाबत अंदाज लागू शकला नाही. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत विहिरीमधील पाण्यामध्ये अपघातग्रस्तांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. अखेर अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते, आज सकाळी पुन्हा मल्हारपेठ पोलिस व स्थानिकांनी पुन्हा सकाळी शोधकार्य सुरू केले आणि काही वेळात संभाजी पवार यांचा मृतदेह आढळून आला.