साताऱ्यात संभाजी भिडेचं प्रतिकात्मक धोतरं जाळलं : आठवले गटाचे अनोख आंदोलन
![Sambhaji Bhide](https://hellonews.co.in/wp-content/uploads/2023/06/hellonews.co_.in-2023-06-29T103053.761-780x470.jpg)
सातारा | स्वातंत्र्यदिनाविषयी वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा साताऱ्यात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. पोवई नाका येथे जमत रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचे धोतर जाळत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच साताऱ्यात होणारा त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशाराही देण्यात आला.
संभाजी भिडे यांनी एका ठिकाणी व्याख्यानादरम्यान भारतीय स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रध्वजाविषयी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाजातील सर्वच स्वरांतून निषेध होत आहे. निषेध व्यक्त होत असतानाच श्री. भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणीही होत आहे. यानुसार अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सातारा येथे होणारा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशाराही देण्यात आला असून राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.
याच आंदोलनाचा भाग म्हणून बुधवारी दुपारी पोवई नाका येथे रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले. त्यांनी श्री. भिडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत राज्य सरकारचा निषेध केला. यानंतर त्यांनी प्रतिकात्मक पुतळा, तसेच धोतर पेटविण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा प्रयत्न हाणून पाडत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पुतळा आणि धोतर जाळले. या वेळी श्री. भिडे यांनी स्वातंत्र्य संग्रामात बलिदान केलेल्यांचा अपमान केला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.