काॅंग्रेस पक्षाच्या फुटीबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…
कराड | पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे दोन तृतीयांश आमदारांना बाजूला जावे लागते. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये फुटीची शक्यता नाही. काँग्रेस पक्षामध्ये 45 आमदारांचा आमचा गट आहे. त्यातील 30-31 आमदार फुटून बाहेर जातील याची अजिबात शक्यता नाही. भाजपाच्या गोटातून खोट्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी विविध पक्षांमधून भाजपमध्ये गेलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये कोणाला काय पद मिळणार? हे बघूया. त्यांना साधे मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करता येत नाही, हे वाटते तितके सोपे नाही, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेस फुटीच्या चर्चेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलकापूर (ता. कराड) येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री प्रेमलाकाकी चव्हाण आणि वडिल आनंदराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमास ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे श्री. चव्हाण म्हणाले, सध्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता सामान्य माणसाचा स्वतःवरतीच विश्वास राहिला आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. यामध्ये फक्त राजकीय नेत्यांनाच दोष देऊन चालणार नाही. त्या राजकीय नेत्याला निवडून कोणी दिलं? अमिषांना कोण बळी पडले? हेही कोणालातरी विचारावे लागणार आहे.
देश हुकुमशाहीच्या दिशेने नेण्याचे काम सुरू : पृथ्वीराज चव्हाण
भाजपाला एका पक्षाची सत्ता किंवा एका पक्षाचे हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे, हे मी गेली अनेक दिवसांपासून सांगत आलो आहे. कित्येक वेळेला अमित शहा म्हटले होते की काँग्रेस मुक्त. काँग्रेसमुक्त म्हणणे म्हणजे तुम्हाला विरोधी पक्ष नको आहे. छोटे पक्ष नको आहेत. एकाच पक्षाचे सरकार पाहिजे आहे. हुकूमशाही पाहिजे. त्यामुळे देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हुकुमशाहीच्या दिशेने देश नेण्याचे काम सुरू आहे. ते जाऊ द्यायचं की नाही हे जनतेच्या हातात आहे, असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.