शेतकऱ्यांनो ! सातबारा असो कि शेतमालाचे दर आता घरबसल्या मिळवा
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
शेतकऱ्याची प्रत्येक पावलावर परफट सुरू असते. सातबारा उतारा असो की शेतमालाचे दर यासह विविध कारणाने शेतकऱ्यांचे वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे सुरू असतात. आता मात्र एका शेतकऱ्यांच्या पोरामुळं शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व सोयी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. कराड तालुक्यातील बेलवाडीच्या निखिल गणेश बोबडे या युवकाने बनवलेल्या मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांना ही माहिती घरबसल्या मिळणार असल्याने हे ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव, शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, योजना कधी आल्या कधी त्याची मुदत संपली हे बऱ्याचदा शेतकऱ्यांना समजत नाही. किंबहुना माहिती शासकीय कार्यालयाकडूनही सांगितली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतमालाचे भाव, सातबारा उतारा, शासकीय योजना, कृषी विषयक बातम्या, भू नकाशा या महत्त्वाच्या बाबीं मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू असते. ते सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना नेहमीच शासकीय कार्यालयासह महासेवा केंद्राचा आधार घ्यावा लागतो.
शेतकऱ्याची ही परवड बेलवाडीच्या निखिल बोबडे यांच्या लक्षात आली. कोरोनाच्या काळात तर शेतकऱ्यांची कागदपत्राअभावी मोठी परवड झाली. याच काळात BCom बरोबरच Certified frontend developer(Angular) / Flutter Developer शिक्षण घेतलेल्या निखिलने शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲप बनवून त्याद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक त्या कागदपत्रांसह माहिती देण्याचे काम सुरू केले. अनेक महिने मेहनत घेऊन वारंवार त्यातील त्रुटींवर अभ्यास करून निखिलने ॲप तयार केले. अखेर त्याची ही मेहनत कामी येऊन शेतकऱ्यांसाठीचे ॲप तयार झाले. हे ॲप नुकतेच मोबाईलवर आले असून त्याचा शेतकऱ्यांसाठी उपयोग होत आहे. हा कराड तालुक्याचा एक प्रकारे सन्मानच म्हणायला हवा अशी प्रतिक्रिया उमटत आहे. https://play.google.com/store/apps/details?Id=com.maha.satbara या लिंक वर जाऊन हे ॲप डाऊनलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे
तब्बल 8 लाख 50 हजार शेतकरी सभासदांनी सभासदत्व स्वीकारले.
निखिलने तयार केलेल्या ॲपला अल्पवधीत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ते 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी डाऊनलोड करत त्याचे सभासदत्व स्वीकारले आहे. या ॲपच्या माध्यमातून सातबारा उतारा, शेतमालाचा बाजारभाव, डिजिटल सातबारा, कृषी विषयक बातम्या, सरकारी योजना, भू नकाशा चावडी यासारखे सर्व उपयोगी फीचर्स या ॲपमध्ये उपलब्ध असल्याचे निखिल बोबडे यांनी सांगितले.