जेवणानंतर काढा पिला : फलटणला पिता- पुत्राचा मृत्यू तर मुलीला वाचविण्यात यश
फलटण | फलटण शहरातील नारळी बाग या मध्यवर्ती भागातील पिता-पुत्रांचा 15 मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री जेवणानंतर घशात त्रास होवू लागल्याने आयुर्वेदिक काढा घेतलेल्या पिता, पुत्र व मुलीला विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये पिता- पुत्राचा मृत्यू झाला असून शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. अविनाश उर्फ हणमंत रामभाऊ पोतेकर (वय- 52) व अमित अविनाश पोतेकर (वय- 32) असे मृत्यू झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. तर मुलगी श्रध्दा पोतेकर हिला वाचविण्यात डाॅक्टरांना यश आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अविनाश पोतेकर हे शहरातील नारळी बाग या परिसरामध्ये पत्नी, मुलगा व मुलगी समवेत राहण्यास होते. त्यांचा भाजी व चहाविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अमित हा पुणे येथे खासगी बँकमध्ये नोकरीस होता. शनिवारी अमित हा पुण्याहून घरी आला होता. त्यानिमित्ताने घरी पुरणपोळी व संध्याकाळी मटणाचे जेवण बनविण्यात आले होते. रात्री जेवनानंतर घरातील सर्वजण झोपी गेले होते.
काही वेळानंतर पिता-पुत्राच्या घशामध्ये त्रास होऊ लगला व खोकला आल्याने त्यांनी आयुर्वेदिक काढा करून पिला होता. मध्यरात्री नंतर उलट्या होऊ लागल्याने त्यांना खासगी रुणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सकाळी पावणे सातच्या सुमारास वडील अविनाश पोतेकर यांचा तर 15 मिनिटांच्या वेळाने मुलगा अमित पोतेकर याचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.