कराडातील डाॅक्टरच्या बंगल्यावर 46 लाखांचा दरोडा : तब्बल 48 तोळे सोने लुटले
कराड । डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा टाकून तब्बल 46 लाख रुपयांची लूटमार करण्यात आली. हातात धारदार शस्त्र घेऊन बंगल्यात घुसलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी चाकू आणि सूऱ्याचा दाखवून कुटूंबाला धमकावले. त्यानंतर 27 लाखाची रोकड आणि 19 लाखाचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले. शहरातील बारा डबरी परिसरातील शिंदे मळ्यात सोमवारी पहाटे ही घटना घडली. याबाबत पूजा राजेश शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घSataraटनास्थळी कराड पोलिसांसह मल्हारपेठ, पाटण येथीलही अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. डाॅग स्काॅड आणि ठसेतज्ञ यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बारा डबरी रोडवर शिंदे मळा येथे डॉ. राजेश शिंदे व पूजा शिंदे हे दाम्पत्य कुटुंबासह राहण्यास आहे. वैद्यकीय खर्चासाठी त्यांनी पै-पाहुणे तसेच नातेवाईकांकडून गत काही दिवसात पैसे गोळा केले होते. ते पैसे घरात होते. तसेच नातेवाईकाच्या विवाह समारंभासाठी पूजा यांनी बँकेत लॉकरमध्ये असलेले दागिनेही घरात आणून ठेवले होते. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यानंतर सर्वजण झोपी गेले. डॉ. राजेश हे बंगल्यातील पहिल्या बेडरूममध्ये होते. तर पत्नी पूजा या मुली व आईसमवेत दुसऱ्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पूजा यांना पती राजेश यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे उठून त्या बाहेर आल्या. जिन्यावरून त्या बेडरूमकडे निघालेल्या असताना जिन्यावर दोघांनी त्यांना अडवले. तसेच बेडरूममध्ये आणखी तीन ते चारजण असल्याचे पूजा यांच्या निदर्शनास आले. संबंधित दरोडेखोरांनी डॉ. राजेश व पूजा यांना चाकूचा धाक दाखवून बेडरूममध्ये नेले. तसेच इतर कुटुंबीयांनाही चाकूचा धाक दाखवून त्यांच्या बेडरूममध्ये थांबवून ठेवले. याचदरम्यान दरोडेखोरांनी पूजा यांच्यासह त्यांची आई व नणंदेच्या गळ्यातील तसेच कपाटात ठेवलेले 48 तोळे वजनाचे 19 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 27 लाख रुपयांची रोकड लुटली. ऐवज घेऊन दरोडेखोर बंगल्याला बाहेरून कड्या घालून पसार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करून ती परजिल्ह्यात पाठविली. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तपास करीत आहेत.