साताऱ्यात ठेकेदारीच्या कारणातून आयुक्ताच्या कार्यालयात दोन गटात राडा
RPI आठवले गट आणि गवई गट एकमेंकांना भिडले

सातारा। साताऱ्यात पोवई नाका येथे असलेल्या कामगार आयुक्तालय कार्यालयात आज (दि. 12) दुपारी दोन गटात जोरदार राडा झाला. RPI आठवले गट आणि गवई गटातील 25 ते 30 जणांचा जमाव समोरासमोर भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये एकाला मारहाण झाली असून 4 ते 5 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, RPI आठवले गट आणि गवई गटात ठेकेदारीच्या कारणातून दोन गटात धुसफूस सुरू होती. यातूनच दोन्ही गट सहाय्यक कामगार आयुक्तालय कार्यालयात एकमेकांसमोर आल्याने वाद निर्माण झाला. यामध्ये दोन्ही गटामध्ये मारामारीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे पंधरा मिनिटे ही वादावादी सुरू होती. उपस्थित गोपनीय पोलिसांनी मात्र, बघ्याची भूमिका घेत घटनेचे चित्रीकरण करण्यातच धन्यता मानली.
या वादावादीमुळे शासकीय कर्मचारी आणि पोलिस यंत्रणा हतबल असल्याचे पहायला मिळाले. ठेकेदार अन् त्याचे साथीदार यांनी मनमानी करत कायदा हातात घेतला. तरीही केवळ बघ्यांची भूमिका पोलिसांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तेव्हा प्रशासकीय कार्यालयात असा धिंगाणा होत असेल तर सामान्यांचे काय असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.