कराड कोर्टातून तब्बल 1 कोटी 11 लाखांची कुटुंबियांना अपघात भरपाई
कराड। वाहन अपघात प्रकरणी वाहन अपघात न्यायाधीकरणाकडे दाखल असलेल्या प्रकरणात वाहन अपघात प्रकरणी विक्रमी भरपाई देण्यात आली आहे. कराड तालुक्यातील सुपने येथील अर्जदाराच्या खात्यात जमा तब्बल 1 कोटी 10 लाख 96 हजार 744 रूपये भरपाई देण्यात आली आहे. अर्जदारांतर्फे ॲड. ऋषिकेश प्रल्हादराव मोरे यांनी काम पाहिले होते, त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
याबाबतची माहिती अशी, सुपने (ता. कराड) या गावचे जवान विनोद अशोक गायकवाड हे ब्लॅक कॅट कमांडो म्हणून कार्यरत होते. त्यांचे दुर्दैवाने 2017 साली गुडगाव येथे अपघाती निधन झाले. त्यानंतर कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात मोटार वाहन कायद्या अंतर्गत नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्यात आला. विमा कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने गणेश करवाडे, डेप्युटी जनरल मॅनेजर पुणे रीजनल ऑफिस महेश ढोबळे, डेप्युटी मॅनेजर कोल्हापूर सूट क्लेम्स हब आणि श्री श्रीराम रामदासी, प्रशासनिक अधिकारी , पुणे रीजनल ऑफिस यांनी या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली. तसेच सकारात्मकपणे तातडीने पावले उचलत तब्बल 1 कोटी 10 लाख 96 हजार 744 रुपये अर्जदारांना नुकतेच देण्यात आले. मृत विनोद गायकवाड यांच्या पश्चात परिवारास ही रक्कम देण्यात आली आहे.
सदरची तडजोड घडवून आणण्यात विमा कंपनीचे वकील ॲड. आर. एन. कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अर्जदारांतर्फे ॲड. ऋषिकेश प्रल्हादराव मोरे यांनी काम पाहिले. देशसेवा करणाऱ्या ब्लॅक कॅट कमांडोच्या कुटुंबाला उचित व वेळेत भरपाई मिळवून दिली याचे समाधान मोठे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांच्या न्यायालयातील हे प्रकरण नुकतेच निकाली निघाले आहे.