कोयनेत धुवांधार पाऊस 36 तासात 7 टीएमसी पाणी वाढले : अनेक मार्ग बंद

– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या 36 तासात 7 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर आज दिवसातील 9 तासात 3. 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. कोयना परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वनविभागाने ओझर्डे धबधबा पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. बुधवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 34. 3 टीएमसी कोयना धरणात पाणीसाठा साठला आहे. पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरातील काडोली ते संगमनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे परिसरातील ओढे, नाले भरुन वाहत आहेत. त्याचबरोबर जोरदार पावसामुळे धोम, बलकवडी, कोयना, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वाढत चालला आहे. त्यातच मंगळवारी रात्रीपासून पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
पाटण तालुक्यातील संगमनगर- काडोली असलेल्या मार्गावर काजरी नदीचे पाणी गेले आहे. मोरगिरी भागातील वाडीकोतावडे गावाला जोडणारा जुना फरशी पूल पाण्याखाली गेला आहे. मोरणा परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक दुकानात तसेच बसस्थानकात पाणी शिरले आहे.
कोयनेत 34. 3 टीएमसी पाणीसाठा…
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 34. 3 टीएमसी पाणीसाठा होता. सकाळच्या सुमारास धरणात 31. 10 टीएमसी साठा होता. धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. सकाळपासून गेल्या 9 तासात कोयनेला- 165 मिलीमीटर, नवजा- 111 मिलीमीटर व महाबळेश्वर येथे 153 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 1472, नवजा- 2075 आणि महाबळेश्वरला- 2075 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.