सह्याद्री साखर कारखाना परिसरातील डोंगरात बहेली सापळा सापडला

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
शहापूर (ता. कराड) येथून जवळच असलेल्या सह्याद्री साखर कारखाना परिसरातील डोंगरात एक बहेली सापळा सापडला आहे. त्यामुळे या परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी एखादी टोळी वावरत आहे की काय ? अशी चर्चा जोरदार ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शहापूर येथील स्थानिक शेतकरी धनाजी पाटील यांचा पाळीव कुत्रा हा रानात गेला असताना, त्याचा पाय एका सापळ्यात अडकला. सदर कुत्रा सापळा व साखळीसह घेऊन लंगडत आपल्या मालकाच्या घरापर्यंत आला, कुत्रा रस्त्यावरून घराकडे जात असताना योगेश शिगण यांनी ते पाहिले. त्यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना फोटो पाठवले. त्यानंतर हा सापळा असल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभिर्य ओळखून रोहन भाटे यांनी त्वरीत उपवनसंरक्षक सातारा व वन्यजीव अपराध नियंत्रण बुरो यांना माहिती दिली.
दरम्यान, हा सापळा बिबट्या किंवा वाघाच्या शिकारीसाठी मध्य प्रदेशात वापरला जातो. मात्र या डोंगर परिसरात बिबट्या किंवा वाघाचा वावर अद्याप आढळून आलेला नाही. हा सापळा या भागात सापडला असला तरी या परिसरात असणाऱ्या रानटी डुक्कर, साळींदर, ससा आधी वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावला असण्याची शक्यता वन विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अधिक तपास वनक्षेत्रपाल तुषार नवले करीत आहेत. नागरिकांनी काही संशयास्पद शिकारी भागात वावरत असतील तर वनविभागास त्वरीत संपर्क करावे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठवले जाईल. असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.