मलकापूरात घरफोडी : दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
कराड | कडी-कोयंडा तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास केले. मलकापुरातील जगदाळे मळा मार्गावरील कच्छी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. याबाबत मेहबूब पैगंबर बैग यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील जगदाळे मळा मार्गावर असलेल्या कच्छी अपार्टमेंटमध्ये मेहबूब बैग हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. ते फिरता व्यवसाय करतात. मंगळवारी काही कामानिमित्त ते कुटूंबासह बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर कुलूपबंद होते. दरम्यान, रात्री चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील स्वयंपाकगृहात असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजाही त्यांनी उचकटला. त्या कपाटातील 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे दागिने त्यांनी लंपास केले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये एक तोळ्याचा गंठण, अंगठी, कर्णफुले, झुबे, सोन्याची चमकी, सोन्याचे सुट्टे मणी, एक तोळ्याचा नेकलेस आदी दागिण्यांचा समावेश आहे. तसेच चोरट्यांनी चाळीस हजाराची रोकडही लंपास केली आहे.
मेहबूब बैग हे बुधवारी सकाळी घरी परत आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते तपास करीत आहेत.