यवतेश्वर- कास घाटात पुन्हा दरड कोसळली: रस्त्याच्या मध्यभागपर्यंत दरडीचे दगड पडल्याने वाहतुकीला अडथळा

सातारा | साताऱ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास- यवतेश्वर घाटामध्ये पुन्हा एकदा दरडी कोसळू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानकच यवतेश्वर घाटामध्ये मोठी दरड कोसळल्याने यवतेश्वर वरून कासकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच यवतेश्वर घाटामध्ये अनेक दरडी कोसळत होत्या. त्यामुळे धोकादायक झालेल्या दरडीचे दगड सातारा बांधकाम विभागाच्या माध्यमातून काढण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा धोकादायक दरडी आता निसटू लागल्याने यवतेश्वर घाटामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने पुन्हा एकदा घाटातील परिसराचा सर्व्हे करून धोकादायक असलेल्या दरडी हटवाव्यात, अशी मागणी आता पर्यटकांकडून होऊ लागली आहे.
पुढील महिन्यात कास पठारावर फुलाचा हंगाम बहारला जात असल्याने पर्यटक या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. कासला जगप्रसिध्द पठार पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात, या ठिकाणावरीला फुलांचा हंगाम आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात असतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दरडी कोसळणे म्हणजे एकप्रकारे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. तेव्हा अशा धोकादायक दरडी लवकरात लवकर हटविणे गरजेचे आहे.
वांग धरणातून पुढील 12 तासात पाणी सोडले जाणार
वांग धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील संततधार पावसामुळे वांग मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. धरणाची वक्र द्वारे खुली असल्याने धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग पुढील 12 तासात सुरु होऊ शकतो. वांग नदी काठावरील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, नदी पात्रामध्ये प्रवेश करु नये.



